Welcome to Deepstambh
Mail Us deepstambh27@gmail.com
logo
Call Us 0257 - 2242299

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

2000 साली एरंडोल या तालुक्याच्या गावाहून मी पुण्याला MA इंग्लिश करण्यासाठी गेलो. माझ्या वडिलांची इच्छा होती "मी स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी व्हावे" म्हणून पुणे विद्यापीठातून MA इंग्लिश झाल्यानंतर ज्ञान प्रबोधनी मध्ये स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण घेऊ लागलो. यादरम्यान मी दोन वेळा एमपीएससी पूर्व परीक्षा पास झालो. सुरवाती पासूनच मला शिक्षण क्षेत्राची ओढ व सामाजिक कामाची आवड होती. ज्ञान प्रबोधनी मध्ये असताना सहकारी, शिक्षक, समुपदेशक अशा वेगवेगळ्या भूमिकेतून मी ज्ञानप्रबोधनी च्या कामात सहभाग देऊ लागलो. यासोबतच एमपीएससीचा अभ्यास ही करीत होतो. पण एमपीएससी करावे असं काही मनापासून वाटत नव्हतं. त्याच काळात मला जाणीव झाली माझे वडील जागरूक आहेत, त्यांच्याकडे माझे शिक्षण करण्याइतपत पैसे आहेत म्हणून मी पुण्यात येऊन शिक्षण घेऊ शकलो. पण ग्रामीण भागातील माझे मित्र-मैत्रिणी ज्यांच्याकडे पैसे नाहीत, जागृकता नाही, ते शहरात जाऊन शिक्षण घेऊ शकत नाही. ही परिस्थिती मला खूप अस्वस्थ करणारी होती.

ग्रामीण आदिवासी भागात उत्तम शिक्षण प्रशिक्षणाची सोय झाली तर निश्चितच या भागातील मुलेही अधिकारी म्हणून घडू शकतील व वेगवेगळ्या व क्षेत्रात यशस्वी करिअर करू शकतील. पण हे कोण करणार? कधी करणार ? मग आतून वाटले की आपणच यासाठी काम करावे. स्वामी विवेकानंद , महात्मा गांधी ,आंबेडकर , कर्मवीर भाऊराव पाटील हे महान व्यक्ती माझे आदर्श. त्यांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर असल्याने ज्ञान प्रबोधनी मध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून करत असलेले काम, सोबतच शिक्षकांसाठीही राबवत असलेले प्रकल्प, पुणे विद्यापीठातील पीएचडी अशा प्रगतीच्या अनेक संधी असतांनादेखील "ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी कार्य करण्याचे मी ठरविले व जळगाव येथे दीपस्तंभ फाउंडेशन ची स्थापना केली. खालील उद्दिष्ट ठेवून कामाला सुरुवात केली.

1.ग्रामीण, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देऊन कर्तव्यदक्ष ,प्रामाणिक, संवेदनशील व धाडसी अधिकारी घडविणे .
2.शुल्क भरू शकणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत च दुर्बल घटकातील गरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहित करणे व त्यांना विनामूल्य स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण ,करियर कौन्सिलिंग, व्यक्तिमत्व विकास या बाबतीत मार्गदर्शन करणे .
3. ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थिनी विशेषत महिला मोठ्या शहरात जाऊन स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण घेऊ शकत नाहीत त्यांना स्पर्धा प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे.

सुरुवातीला मला बऱ्याच व्यक्तींनी काळजीपूर्वक सल्ला दिला की, ग्रामीण भागात जळगाव सारख्या ठिकाणी काम करण्या ऐवजी, पुण्यात काम कर. प्रगती उत्तम होईल. पण सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचा न्यूनगंड कमी करून त्यांना वैयक्तिक स्तरावर उत्तम मार्गदर्शन मिळावे म्हणून चळवळ सुरू केली. नामदेव पाटील, नरेंद्र पाटील,दीपक बाविस्कर, सुयोग नगरदेवळेकर, चिंचोले सर हे सर्व या कार्यात सहभागी झाले. ग्रामीण भागातील अनेक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये " मी स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होऊ शकतो" असा आत्मविश्वास निर्माण झाला.अनेक अडचणीवर मात करून,खूप कष्ट करून ग्रामीण भागातून अधिकारी झालेले माझे जेष्ठ मित्र राजेश पाटील, संदीपकुमार साळुंखे यांनी शाळा महाविद्यालयात जाऊन विद्यार्थांना मार्गदर्शन केले. तरुणामधील क्षमतेला योग्य प्रोत्साहन ,मार्गदर्शन मिळाले की तेही निश्चितच प्रगती करू शकतात या तळमळीने सुरू केलेल्या या चळवळीला दोन ते तीन वर्षातच यश आले.ग्रामीण आदिवासी भागातील हजारो विद्यार्थी - विद्यार्थिनी स्पर्धा परीक्षा देऊन क्लास वन ,क्लास टू अधिकारी होऊ लागले.दीपस्तंभ संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचले.

दीपस्तंभने त्यानंतरच्या काळात पूर्णवेळ प्रामाणिकपणे काम करणाऱ्या ,नवनवीन तंत्रज्ञान व बदल स्वीकारून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या तज्ञ मार्गदर्शकाची फळी उभी केली.

ज्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारच्या मार्गदर्शन वर्गाला जाता येत नाही, त्यांना किमान मार्गदर्शन व उत्तम दर्जाचे अभ्यास साहित्य मिळाले पाहिजे. या उद्देशातून "दीपस्तंभ प्रकाशन विभाग" सुरू केला.याध्यमातून दीपस्तंभ ने सर्वोत्तम श्रेणीची अर्थशास्त्र,भूगोल ,विज्ञान ही " फोर कलर प्रिंटिंग" पुस्तके विद्यार्थ्यांसाठी तयार केली.हजारो विद्यार्थी या पुस्तकांचा अभ्यास करून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन वेगवेगळ्या पदांवर अधिकारी झाले आहेत.

नवीन बदल स्वीकारुन दीपस्तंभ ने ऑनलाईन प्रशिक्षण सुरू केले आहे. महाराष्ट्रा सोबतच संपूर्ण भारतातील तसेच परदेशातील विद्यार्थी एप्रिल 2020 पासून ऑनलाईन प्रशिक्षण घेत आहे.